महाराष्ट्रभरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बंजारा समाजबांधवांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेनगरीत बंजारा समाजाचा पहिला राष्ट्रीय गुणगौरव आणि सामाजिक पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला. झेप फाउंडेशन, पुणे (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथील पत्रकार भवनात दुपारी १ ते ४ या वेळेत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रभरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बंजारा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना फेम, मेडल आणि सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. गिरीश प्रभुणे, आर्यवर्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, त्रिपुरा येथील माजी कुलगुरू प्रकाश करमाडकर, कुंभमेळा जगद्गुरू नामदेव महाराज खालसा आखाड्याचे उपाध्यक्ष महंत श्रीकांत दास धुमाळ महाराज, सहाय्यक कृषी अधिकारी पुष्पक उत्तम राठोड, बंजारा समाजसेवक तथा वकील ॲड. रमेश खेमु राठोड, वेस्ट फूड इंटरनॅशनल ट्रेनर डॉ. प्रा. राजू पांचाळ, भारतीय सैन्यातील एनएसजी कमांडो सुभेदार गोविंद भाऊराव कांगणे, भारतीय सैन्यातील गुणवत्ता आश्वासन अधिकारी संजय रामचंद्र कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, युवा ग्रामीण पत्रकार संघ (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत), पोलीस तपास सीनियर क्राइम रिपोर्टर तथा सामाजिक कार्यकर्ते कांताभाऊ राठोड यांच्यासह हरिभाऊ थोरात, दुष्यंतराजे जगताप, शेखर कोरडे, सोनाली जाधव, माधवी महापुरे, झेप फाउंडेशनच्या पदाधिकारी अलका मुसळे, रमेश राठोड आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. माजी कुलगुरू प्रकाश करमाडकर यांनी समाजातील एकता, संघटन आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. प्रा. राजू पांचाळ यांनी अन्नाची नासाडी टाळून अन्नाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. महंत श्रीकांत दास धुमाळ महाराज यांनी कर्करोगावरील औषधोपचार आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
ॲड. रमेश राठोड यांनी बंजारा समाजबांधवांनी जुन्या अनिष्ट रूढी-परंपरांना बाजूला ठेवून शिक्षण, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राकडे वळावे, मोठे उद्योजक बनून समाजाच्या आर्थिक प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. तर सुभेदार गोविंद कांगणे यांनी विश्वकल्याणाच्या उद्देशाने पायी सुमारे २० हजार किलोमीटरची परिक्रमा करण्याच्या आपल्या संकल्पाची माहिती उपस्थितांना दिली.
या वेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनीही आपले अनुभव आणि भावना व्यक्त करत सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानले.
बंजारा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने झेप फाउंडेशनने आयोजित केलेला हा सोहळा महत्त्वपूर्ण ठरला. समाजातील गुणवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.


