समाजबांधवांच्या सर्वसंमतीने निर्णय; संत सेवालाल महाराज मंदिरात शपथ घेऊन पदभार स्वीकारला
कल्याण : आंबिवली-अटाळी-वडवली, दि. २० सप्टेंबर २०२६ संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळ, आंबिवली-अटाळी-वडवली-नेपच्यून यांच्या वतीने आयोजित समाजाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. समाजबांधवांच्या सर्वसंमतीने कपूरचंद पवार यांची नायकपदी, तर विजय राठोड (बुवा महाराज) यांची कारभारीपदी नियुक्ती करण्यात आली.
रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी संत सेवालाल महाराज मंदिरात धार्मिक वातावरणात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी नवनियुक्त नायक कपूरचंद पवार आणि कारभारी विजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात शपथ घेऊन आपापल्या पदाची जबाबदारी स्वीकारली.
संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळाचे गेल्या चार वर्षांपासून श्री. अंबादास पंडित राठोड हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध मान्यवर तसेच समाजबांधवांच्या उपस्थितीत नायक आणि कारभारी या पदांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने दोन्ही पदांवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस ईश्वर राठोड, ईश्वर जाधव, कपूरचंद पवार, विजय बुवा राठोड, गोकुळ चव्हाण, देवराव राठोड, वाडिलाल चव्हाण, हेमराज चव्हाण, अरुण चव्हाण, कांतीलाल राठोड, अशोक चव्हाण, डॉ. युवराज राठोड, कैलास तंवर, श्याम राठोड, शरद राठोड, सतीश राठोड (पत्रकार), गोकुळ चव्हाण (न्यायडोंगरी), जीवन चव्हाण, अंबादास राठोड (वडगाव), आशाबाई राठोड, शोभाबाई राठोड, आशाबाई अंबादास राठोड, सविता ईश्वर राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने गोर बंजारा समाजबांधव उपस्थित होते.
समाजातील एकोपा, संघटन आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सर्वांच्या सहमतीने नायक आणि कारभारी या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. भगवान संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने समाजाच्या हितासाठी तसेच सामाजिक कार्याला अधिक गती देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्यरत राहतील, असा विश्वास यावेळी उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.
दरम्यान, लहुजी नगर पोलिस चौकी, रेल्वे स्टेशन, मोहने-कोळीवाडा परिसरातील समाजबांधवांच्या उपस्थितीत तसेच मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
नवनियुक्त नायक कपूरचंद पवार आणि कारभारी विजय राठोड यांचे उपस्थित समाजबांधवांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील एकजूट अधिक बळकट करून सामाजिक कार्याला नवी दिशा देण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

