जासई, डुंबावाडी येथे असलेली वस्ती ही लभान बंजारा समाजाची आहे अन येथील लोकवस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी "तांडा विकास योजना" लागू करावी अशी मागणी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी केली आहे. तसेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो, देश सुजलाम सुफलाम झाला असला तरीही भटके विमुक्त समाजाच्या समस्या आजही सुटलेल्या नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली, जासई डुंबावाडी येथील नागरीकांना मुलभुत सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधून द्यावी अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली. वस्तीतील सदर जमीन ही वनविभागाची असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्याचे सांगत या लोकांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आमदार महेश बालदी यांना सोबत घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन याप्रसंगी बोलताना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांनी सुंदर डांगे यांच्या मागण्या या रास्त असून आम्हाला व प्रशासनाला या जासई डुंबावाडीतील लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला अशी जाहीर कबूली देत, स्थानिक प्रशासन असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, मंत्रालय असो वनविभाग असो वयक्तिक लक्ष घालून या नागरिकांना कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी पुरेपुर प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले. यावेळी गटविकास अधिकारी वाठस्कर यांनी योजनेची सविस्तर माहिती देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमासाठी जासई ग्रामपंचायत सदस्य व परीसरातील कार्यकर्ते तसेच जासई डुंबावाडी येथील लभान बंजारा समाजाच्या माता भगीनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोरीलाल भालेकर, प्रकाश येरकर व विजय भिडे यांनी पुढाकार घेतला.



