ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे यांच्या वतीने दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे ‘उत्तुंग भरारी घेऊया २०२३’ हा करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. यजुर्वेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाजन यांच्या सामाजिक जाणिवेतून उदयास आलेली ‘दीपस्तंभ – बहुउद्देशीय संस्था’ मनोबल, संजीवन आणि गुरुकुल या तीन सामाजिक प्रकल्पांच्या माध्यमातून बहुसंख्य दिव्यांग, अनाथ, आदिवासी व ग्रामीण भागातील मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करत आहे.
या सेमिनारच्या माध्यमातून श्री. महाजन यांनी विद्यार्थ्यांना 'करिअर कसे निवडावे ?' , 'आयुष्यात महत्वाचं काय ?', 'चांगला माणूस होण्यासाठी काय करावे ?' अशा विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना हसत खेळत सोडवून दाखवली. तसेच या व्याख्यानादरम्यान आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून जिद्दीने यशाला गवसणी घालणाऱ्या दीपस्तंभाच्या विद्यार्थ्यांची कहाणी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितली. या सेमिनारची संकल्पना शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विलास ठुसे यांची होती.
या कार्यक्रमास शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विलास ठुसे, सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संस्थेच्या विश्वस्त व आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ऍड. सुयश प्रधान, आनंद विश्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यशस्वी माणूस होण्यासोबतच 'एक चांगला माणूस होणे' देखील महत्वाचे आहे हा संदेश या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवला गेला.
Tags
ठाणे