"सेंद्रिय आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी गोकृपा अमृतम कल्चर हे प्रभावी माध्यम ठरू शकते. याच्या नियमित वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते, तसेच रासायनिक खते व औषधांवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते. मोखाडा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी गोकृपा अमृतम कल्चरचा जास्तीत जास्त वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करावा."
- मा. अमोल जोशी, तालुका कृषी अधिकारी, मोखाडा
प्रतिनिधी (मोखाडा) : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मोखाडा तालुक्यातील विविध गावांमध्ये कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांना शेतकरी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक व सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मंडळ कृषी अधिकारी मोखाडा यांच्या कार्यक्षेत्रातील आसे, बेरिस्ते, हिरवे, चास, मोखाडा, दांडवळ, मो-हांडा, वाशाळा, सातुर्ली, साखरी, पोशेरा आणि खोच या सहाय्यक कृषि अधिकारी यांच्या मुख्यालयातील गावांमध्ये भात पिकासंदर्भातील विविध प्रात्यक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान भात बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी ३ टक्के मिठाच्या द्रावणाचा वापर करून प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच ऑटोबॅक्टर, पीएसबी आणि गोकृपा अमृतम् कल्चर या द्रवरूप जैविक संवर्धकांच्या साहाय्याने बीजप्रक्रिया करण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोकृपा अमृतम्’ तयार करण्याची पद्धत व त्याचा प्रभावी वापर याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी मोखाडा अमोल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, मंडळ कृषी अधिकारी भरत पवार यांनी गावोगावी भेटी देत बायोचार खड्डा पद्धत, फळबागांमधील जैविक आच्छादन आणि गोकृपा अमृतम् कल्चर तयार करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली.
यावेळी पाणी फाउंडेशनचे मेंटॉर विजय जाधव यांनी कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘फार्मर कप’ स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. गट बांधणी, सामूहिक खरेदीद्वारे बियाणे, खते, औषधे व इतर कृषी निविष्ठांवरील खर्चात बचत, तसेच स्पर्धेतील बक्षीसासाठी निवड, निकष व बक्षीसप्राप्ती ची प्रक्रिया याबाबत त्यांनी माहिती दिली.
उप कृषी अधिकारी रामराव जगताप यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व, जैविक निविष्ठांचा योग्य वापर, सेंद्रिय शेतीद्वारे उत्पादनवाढ आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील शिंदे, आनंद गवई, गणेश राठोड, लक्ष्मीकांत भुसावरे, सतीश बाविस्कर, सोनाली पाटील, अमोल सदावर्ते, भाविन किरकिरे आणि जितेंद्र गावीत यांनी मोलाचे सहकार्य केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तसेच सेंद्रिय शेती पद्धतींची उपयुक्त माहिती मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी खरीप हंगामात या तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
Tags
पालघर