समाजसेवा, संघर्ष आणि नेतृत्वाचा गौरव
जळगांव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अशोकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.सदर नियुक्ती ही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मुरलीधरजी चव्हाण,राष्ट्रीय खजिनदार-राजेशजी नाईक,नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-सतिषभाऊ राठोड, यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.यावेळी मा.कैलासभाऊ जाधव(जिल्हा उपाध्यक्ष)
सुनिलभाऊ राठोड(सामाजिक कार्यकर्ता)
अजमलभाऊ पवार(सामाजिक कार्यकर्ता) यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशोकराव चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था,जामनेर या संस्थेमार्फत समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली असून, शासन स्तरावर पाठपुरावा करून अनेक समस्या मार्गी लावण्याचे काम करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे,ते गेल्या १५ वर्षांपासून पिंपळगाव कमानी ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ग्रामविकास, लोकहित आणि सामाजिक सलोखा जपत त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना गती दिली आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांना गावकऱ्यांचा मोठा विश्वास आणि पाठिंबा लाभला आहे.
समाजातील विविध प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा शासन दरबारी आवाज उठविला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. याशिवाय समाजातील विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे.
अशोकराव चव्हाण यांचे कार्य केवळ संघटनात्मक किंवा सामाजिक प्रश्नांपुरते मर्यादित नसून मानवतेच्या सेवेशीही जोडलेले आहे. गेल्या दहा वर्षांपासून गरजू रुग्णांसाठी रक्तदान आणि रक्तदात्यांचे जाळे निर्माण करण्याचे कार्य त्यांनी अविरतपणे सुरू ठेवले आहे.अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबा देवी यांच्या मोहने-आंबिवली येथील मंदिराच्या नवनिर्माणासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.गेल्या दहा वर्षांपासून स्थानिक आजी-माजी आमदार, नगरसेवक तसेच विविध शासकीय विभागांकडे सातत्याने पत्रव्यवहार करून मंदिर उभारणीसाठी पाठपुरावा केला आहे.समाजाच्या श्रद्धास्थानाच्या विकासासाठी केलेले त्यांचे हे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते.
अशोकराव चव्हाण यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.समाजहित,जनसेवा आणि संघटनात्मक कार्य यांचा उत्तम समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय बंजारा टायगर्स सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी झालेल्या त्यांच्या निवडीमुळे संघटनेला नवे बळ मिळणार असल्याची भावना समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.
समाजातील शिक्षण, रोजगार,आरोग्य,सामाजिक न्याय आणि युवक सक्षमीकरण या विषयांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच लाभ होईल,असा विश्वास संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल समाजातील विविध संघटना,सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून अशोकराव चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या या पदावर निवड झाल्याबद्दल बंजारा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजातील विविध सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Tags
जळगाव