सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि संघटन कौशल्याची दखल; सतिष एस. राठोड यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती



मुंबई, प्रतिनिधी : समाजहितासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सतिष एस. राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामभाऊ जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष मुरलीधरजी चव्हाण, राष्ट्रीय खजिनदार राजेशजी नाईक तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
     बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी नोव्हेंबर २०२५ मध्ये तब्बल सहा दिवसांचे जल व अन्नत्याग आमरण उपोषण करून शासनाचे लक्ष वेधणारे तरुण नेतृत्व म्हणून सतिष राठोड यांची राज्यभर विशेष ओळख निर्माण झाली आहे. समाजहितासाठी केलेल्या त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
     सन २०१८ मध्ये राष्ट्रीय बंजारा टायगर्समध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश केलेल्या राठोड यांनी आपल्या निष्ठा, कार्यक्षमता आणि संघटन कौशल्याच्या बळावर संघटनेत वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकार म्हणून समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि अन्यायग्रस्त घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडताना त्यांनी समाजहितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले. तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी संघटना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले. युवकांचे संघटन, सामाजिक जनजागृती आणि विविध प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याच्या कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यक्षमतेमुळे संघटनेने त्यांच्यावर वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या.
        संघर्ष, समर्पण आणि समाजसेवा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख राहिली आहे. अनेक अडचणी, विरोध आणि आव्हानांचा सामना करत त्यांनी संघटनेचे कार्य अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ पदांचा प्रवास नसून समाजासाठी केलेल्या त्याग, निष्ठा आणि अथक परिश्रमाचा गौरवशाली इतिहास असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. यावेळी कैलासभाऊ जाधव (जिल्हा उपाध्यक्ष), सुनिलभाऊ राठोड (सामाजिक कार्यकर्ते) आणि अजमलभाऊ पवार (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती होती.
     राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतिष एस. राठोड यांची नियुक्ती झाल्यामुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून त्यांच्या पुढील सामाजिक, संघटनात्मक आणि पत्रकारितेच्या वाटचालीस विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पत्रकारितेतून सामाजिक आणि कामगार चळवळीचे नेतृत्व

     पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि कामगार हक्कांसाठीचा सातत्यपूर्ण संघर्ष यांची यशस्वी सांगड घालत गेली दोन दशके कार्यरत असलेले सतिष साईदास राठोड हे आज सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील एक परिचित आणि विश्वासार्ह नाव बनले आहेत.
     बी.ए. (जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या) पदवी प्राप्त केलेले तसेच टी.वाय. एल.एल.बी.चे शिक्षण घेत असलेले राठोड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. याच अनुभवातून त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. सध्या ते क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
     गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राठोड यांनी सामान्य नागरिक, बंजारा समाज, सुरक्षा रक्षक आणि कामगार वर्गाच्या प्रश्नांसाठी विविध स्तरांवर प्रभावी लढे उभारले आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचावा या भूमिकेतून त्यांनी अनेक आंदोलने, उपोषणे आणि जनजागृती मोहिमा राबविल्या आहेत.
     सन २०२२ मध्ये सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे त्यांनी १९ दिवसांचे जल व अन्नत्याग आमरण उपोषण केले. या आंदोलनादरम्यान सुरुवातीचे ११ दिवस पाण्याचा एकही थेंब न पिता त्यांनी संघर्ष सुरू ठेवला. सुरक्षा रक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या या आंदोलनाची राज्यभर दखल घेण्यात आली.
     त्यानंतर २०२३ मध्ये दिवाळीच्या काळात तीन दिवसांचे जल व अन्नत्याग आंदोलन करून त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. एप्रिल २०२५ मध्ये अंबरनाथ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सुरक्षा रक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी आंदोलन छेडले. त्यांच्या नेतृत्वाखालील संघर्षामुळे प्रशासनाला निर्णय बदलावा लागला आणि अनेक कामगारांचे रोजगार वाचले.
     फेब्रुवारी २०२६ मध्ये नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील १४० सुरक्षा रक्षकांचे प्रलंबित वेतन मिळवून देण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून वेतनाचा प्रश्न मार्गी लावला.
      बंजारा समाजाच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या सहा दिवसांच्या जल व अन्नत्याग आंदोलनामुळे राज्यभर या प्रश्नाची व्यापक चर्चा झाली आणि शासनाचे लक्ष वेधण्यात यश आले. संवाद, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवणारे सतिष साईदास राठोड हे कोणत्याही प्रश्नाचे निराकरण सकारात्मक संवादातून व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र समाजहितासाठी आवश्यक असेल तेव्हा लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यासही ते मागे हटत नाहीत. पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि कामगार चळवळीतील सक्रिय नेतृत्व यामुळे त्यांची ओळख राज्यभरातील विविध स्तरांवर निर्माण झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post