कल्याण | प्रतिनिधी (अशोकराव चव्हाण): ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या देशातील नामांकित संस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त कल्याण विभागीय केंद्रात स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या नव्या बॅचचे उद्घाटन तसेच भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता कल्याण पूर्व येथील महापालिका वार्ड क्रमांक ४- जे विभागीय कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर संपन्न होणार आहे.
स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त मा. रामदासजी कोकरे (घनकचरा व पर्यावरण विभाग) यांच्या हस्ते होणार असून, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
संस्थेच्या १०० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य महारक्तदान शिबिर हे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेचे कल्याण विभागीय संचालक मा. मारुतीजी खोडके यांनी केले आहे.
