डोंबिवली | प्रतिनिधी : महावितरणच्या देयक व महसूल उपविभाग, डोंबिवली (पूर्व व पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडविणे, स्मार्ट मीटरबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करणे आणि ग्राहकांना आधुनिक वीज सेवांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी दि. २३ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'स्मार्ट मीटर जनजागृती व वीज तक्रार निवारण मेळाव्यास' पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मोठ्या संख्येने वीज ग्राहकांनी मेळाव्याला भेट देत विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली तसेच अनेक तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले.
हा तीन दिवसीय मेळावा दररोज सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत देयक व महसूल उपविभाग, गणपती मंदिराच्या मागे, पी. डी. रोड, डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला असून, ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
ग्राहकांच्या विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण
मेळाव्यात आलेल्या ग्राहकांनी वीज बिलातील त्रुटी, स्मार्ट मीटरमधील वीज वापराची नोंद, बिलातील वाढ, मीटर रीडिंग, तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. अनेक तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले, तर ज्या प्रकरणांमध्ये अधिक तपासणी आवश्यक होती त्यावर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली.
स्मार्ट मीटरबाबत शंकांचे समाधान
मेळाव्यात ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, अचूक वीज मोजणी, वापरावर आधारित पारदर्शक बिलिंग प्रणाली, रिअल-टाइम वीज वापराची माहिती, ऑनलाइन सुविधांचा वापर आणि वीज बचतीसाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे स्मार्ट मीटरविषयी समाजात असलेल्या अनेक गैरसमजुती दूर करण्यास मदत झाली. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नाला संयमाने व सविस्तर उत्तरे देत त्यांचे समाधान केले.
ग्राहकाभिमुख सेवेसाठी महावितरणची पुढाकार
या उपक्रमामागील उद्देश केवळ तक्रारींचे निराकरण करणे नसून ग्राहकांना अधिक सक्षम, जागरूक आणि डिजिटल सेवांशी जोडणे हा आहे. महावितरणच्या ग्राहकाभिमुख धोरणाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पारदर्शक सेवा, जलद प्रतिसाद आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनावर विशेष भर देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे आवाहन
डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अण्णासाहेब काळे साहेब तसेच देयके व महसूल उपविभाग, डोंबिवली (पश्चिम) चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता(प्र.) श्री सुनिल गौंड साहेब यांनी सर्व वीज ग्राहकांना या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
२५ जुलैपर्यंत मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन
महावितरणने सर्व वीज ग्राहकांना दि. २५ जुलै २०२६ पर्यंत सुरू असलेल्या या विशेष मेळाव्याला भेट देऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करून घ्यावे तसेच स्मार्ट मीटर व आधुनिक वीज सेवांबाबत अधिकृत माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केले आहे. पहिल्याच दिवशी ५४ ग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन झाल्याने या उपक्रमाला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आगामी दोन दिवसांतही मोठ्या संख्येने ग्राहक मेळाव्यात सहभागी होतील, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.




