आंबिवली : संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात त्रिदल एज्युकेशन सोसायटी संचलित पाटील बाल मंदिर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनी कु. मानवी अरुण चव्हाण हिचा मा. आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
मानवी हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवत विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची लाभली असून पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिच्या यशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशाचे श्रेय देताना मानवीने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्तबद्ध दिनचर्या, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांमुळेच हे यश संपादन करता आल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी आमदार नरेंद्र पवार यांनी मानवीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर जीवनात मोठी उद्दिष्टे गाठावीत, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाला पाटील बाल मंदिर विद्यालयाचे शिक्षकवृंद, पालक तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मानवीच्या यशाचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कु. मानवी अरुण चव्हाण हिच्या या उल्लेखनीय यशामुळे पाटील बाल मंदिर विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या यशाची भर पडली असून, तिची कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र पवार, राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रीय बंजारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकन जाधव, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस आरती राठोड, डॉ. युवराज राठोड, विठ्ठल राठोड महाराज, गजानन राठोड, संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अंबादास राठोड, उपाध्यक्ष पोपट राठोड, सचिव सुनील जाधव, खजिनदार ईश्वर राठोड, अरुण चव्हाण, सुरेश पवार, उमेश पवार, अनिल राठोड तसेच संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गोर बंजारा समाजबांधव, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
