जालना येथे १ नोव्हेंबरला परिषद; समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी संघटित होण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करून आदिवासी समाजाला लागू असलेल्या सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जालना येथे राज्यस्तरीय बंजारा एसटी आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्रातील बंजारा समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम सुरसिंग जाधव यांनी केले आहे.
बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून समाजाला घटनात्मक मार्गाने न्याय मिळवून देणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर सखोल चर्चा करून समाजाची भूमिका शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी तसेच घटनात्मक हक्कांच्या मागणीला बळ देण्यासाठी समाजाने संघटित होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.
या परिषदेत आरक्षणाच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्यात येणार असून, समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि समाजबांधव सहभागी होणार आहेत. समाजाच्या व्यापक हितासाठी आपापसांतील मतभेद आणि राजकीय भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिकारी-कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक आणि समाजातील सर्व घटकांनी या राज्यस्तरीय परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ती यशस्वी करावी. बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला बळ देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असल्याने समाजबांधवांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन आत्माराम जाधव यांनी केले आहे.
