वरंदळी येथे गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
वरंदळी : तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील वरंदळी येथे वरंदळीकर कर्मचारी वर्ग व सहकारी वरंदळी यांच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षानिमित्त इयत्ता दहावी, बारावी तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी श्री. राजाराम सीताराम राठोड (पोलीस विभाग) आणि श्री. तारासिंग मोतीराम राठोड (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला उजाळा देत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गणेश हिरासिंग राठोड (मुख्याध्यापक) होते. तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून श्री. तारासिंग मोतीराम राठोड (माजी वरिष्ठ तंत्रज्ञ), श्री. संजय रामजी चव्हाण (शिक्षक) आणि श्री. युवराज प्रेमसिंग जाधव (आरोग्य निरीक्षक) उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा, सामाजिक आणि इतर क्षेत्रांतही उल्लेखनीय कामगिरी करावी, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन आणि आयुष्यभर समाजासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे आयोजन वरंदळीकर कर्मचारी वर्ग, सहकारी व सर्व ग्रामस्थ वरंदळी यांच्या वतीने करण्यात आले.

