मोहने-आंबिवली येथे दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; नवग्रह पूजा, मूर्ती मिरवणूक, सत्संग, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन
आंबिवली : कल्याण तालुक्यातील आंबिवली (पूर्व), लहूजीनगर येथे जय जगदंबा माता व संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त बंजारा समाज, मोहने, बदलापूर, अटाळी, आंबिवली, टिटवाळा, कल्याण व डोंबिवली यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नवग्रह पूजा व वास्तुपूजा होणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत जगदंबा देवी आणि संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत श्री श्याम चैतन्य महाराज यांच्या एक दिवसीय सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजल्यानंतर बंजारा भजन व जागरण होणार आहे.
रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विविध होमहवन, महाअभिषेक, मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी आणि महाआरती होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून श्री श्याम चैतन्य महाराज (चैतन्यधाम), श्री गुरुदेव सेवा आश्रम, जामनेर आणि चंद्रशेखर महाराज पोहरादेवी यांची उपस्थिती लाभणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
हा सोहळा लहूजीनगर, पोलीस चौकीच्या मागे, मोहने, आंबिवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे येथे पार पडणार आहे. जगदंबा माता मंदिर व संत सेवालाल महाराज मंदिर हे आंबिवली (पूर्व) रेल्वे स्थानकापासून जवळच असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या दोन दिवसीय धार्मिक सोहळ्यास बंजारा समाज बांधवांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

