डोंबिवली : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती महावितरण डोंबिवली उपविभाग - १ कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेण्यात आला. डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्त्वांची आठवण करून देण्यात आली. कार्यक्रमात संविधानाच्या महत्त्वावर विशेष भाष्य करण्यात आले. भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली.
महावितरणचे अधिकारी यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विचारांचे पालन करण्याची शपथ घेतली. तसेच कार्यक्रमात सामाजिक ऐक्य आणि एकतेचा संदेश देण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशाची प्रेरणादायी माहिती सांगण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
आर.सी. फाउंडेशनच्या वतीने महावितरण कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
आर.सी. फाउंडेशनच्या वतीने महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला अधिकारी, कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नेत्रतपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करून आवश्यक सल्ला देण्यात आला. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर निदान करून गंभीर आजार टाळणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याबद्दल आर.सी. फाउंडेशनचे कौतुक केले. महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या शिबिराचा लाभ घेतला आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन मिळवले. शिबिरात औषधांचे मोफत वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले.
सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक, टीमवर्कवर भर, मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांचे प्रतिपादन
आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी आपल्या मनोगतातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकतेचा आणि प्रामाणिक कामाचा संदेश दिला. मिश्रा यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या दृष्टीने सर्व कर्मचारी समान आहेत. “कोण कोणत्या युनियनचा आहे किंवा कोणाशी वैयक्तिक ओळख आहे, याला माझ्याकडे काहीच महत्त्व नाही. मी जेव्हा या पदावर बसतो, तेव्हा सर्वांना समान वागणूक देणे हेच माझे कर्तव्य आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. कल्याण परिमंडळातील सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना त्यांनी “एक कुटुंब” म्हणून संबोधले. काम करताना चुका होणे स्वाभाविक असल्याचे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना धीर दिला. “चूक केल्याशिवाय माणूस शिकत नाही. आज जो चुकतो, तोच उद्या तज्ञ बनू शकतो,” असे ते म्हणाले.
तसेच बदल स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धती लागू करताना सुरुवातीला विरोध होतो. मात्र, दीर्घकालीन फायद्यासाठी बदल आवश्यक असतात. त्यांनी आपल्या पूर्वीच्या अनुभवांचा उल्लेख करत सांगितले की, सुरुवातीच्या अडचणींनंतर नवीन प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित होते.
मिश्रा यांनी कार्यालयातील पारदर्शकतेवरही भर दिला. “कोणालाही माझ्याकडे थेट येण्यास मोकळीक आहे. कोणताही भेदभाव केला जात नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे त्यांनी आवाहन केले.
देखभाल (मेंटेनन्स) कामांवर विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “जर वीजपुरवठा सुरळीत असेल, बिलिंग योग्य असेल, तर ग्राहकांकडून तक्रारी येणार नाहीत,” असे सांगत त्यांनी अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले. बी अँड आर विभागासोबत समन्वय ठेवून काम करण्याचेही त्यांनी सुचवले. शेवटी, “आपण सर्व एकाच कुटुंबाचा भाग आहोत. गरज पडल्यास एकमेकांना मदत करणे हीच खरी ताकद आहे,” असे सांगत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.
महात्मा फुले केवळ समाजसुधारक नव्हे तर दूरदर्शी उद्योजक होते - शशीकांत पवार मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन कल्याण परिमंडळ सल्लागार
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सल्लागार शशी पवार यांनी समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबाबत सविस्तर विचार मांडताना त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक दूरदर्शी आणि यशस्वी उद्योजकही होते. पवार यांनी नमूद केले की, महात्मा फुले यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेती होती आणि ते बांधकाम व्यवसायातही अग्रगण्य होते. पुण्यातील भिडे वाड्यात शाळा सुरू करण्यामागे त्यांची आर्थिक व सामाजिक क्षमता कारणीभूत होती. त्यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर शेती, प्रकाशन आणि वितरण यांसारख्या विविध क्षेत्रांतही काम केले.
तसेच, सोन्याच्या दागिन्यांसाठी लागणाऱ्या साच्यांच्या (डिझाईन) निर्मिती व पुरवठा क्षेत्रातही त्यांचे वर्चस्व होते, असे पवार यांनी सांगितले. इतके मोठे उद्योगपती असूनही त्यांनी समाजकार्याची वाट का निवडली, याबाबत बोलताना पवार म्हणाले की, एका विवाह सोहळ्यात केवळ जातीच्या कारणावरून झालेल्या अपमानाने त्यांच्या मनाला खोलवर ठेच पोहोचली. याच घटनेतून त्यांनी समाजपरिवर्तनाचा निर्धार केला. महात्मा फुले यांनी शिक्षणालाच सामाजिक बदलाचे प्रमुख साधन मानले आणि बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. स्त्री शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक समता यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा प्रभावीपणे मांडली. पवार यांनी पुढे सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तेविरुद्ध लढा दिला, तर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समाजातील विषमता आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा लागला. त्यांच्या या लढ्यामुळेच आज समाजात समतेची जाणीव निर्माण झाली आहे. शेवटी, शशी पवार यांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व युगपुरुषांना मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन केले.
समाजकार्य, समता आणि कार्यक्षमतेचा आदर्श घ्यावा - विजय फुंदे
आयोजित जयंती कार्यक्रमात अधीक्षक अभियंता विजय फुंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात फुंदे यांनी युगपुरुषांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, ते स्वतः जळून इतरांना प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजाला दिशा मिळाली असून त्यांच्या विचारांमुळेच आज समतेचा मार्ग खुला झाला आहे. त्यांनी समाजासाठी केलेले योगदान अमूल्य असून त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही.
यावेळी त्यांनी महावितरण कल्याण परिमंडळाच्या कार्यप्रदर्शनाचाही आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या वसुली मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, जसे आयपीएलमध्ये खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतात, तसेच त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व फलंदाजी करत विक्रमी वसुली साध्य केली आहे. या यशामागे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले. फुंदे यांनी सांगितले की, मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा हे अत्यंत समर्पित आणि कार्यक्षम अधिकारी असून ते नेहमीच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या नेतृत्वामुळेच कल्याण परिमंडळाने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संजय मोरे, पाटील साहेब, पवार साहेब यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटी, विजय फुंदे यांनी सर्वांना युगपुरुषांच्या विचारांचे पालन करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वसमावेशक – शिक्षण व समतेचा संदेश - करण थोरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात करण थोरात यांनी प्रभावी भाषणातून युगपुरुषांच्या कार्याचा व्यापक आढावा घेतला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. करण थोरात यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ संविधान निर्माते म्हणून मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. ते जागतिक स्तरावरील अर्थतज्ज्ञ होते. ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून देशाच्या आर्थिक रचनेवर त्यांनी सखोल भाष्य केले असून त्याच विचारांच्या आधारे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला दिशा मिळाली. त्यांनी पुढे सांगितले की, बाबासाहेब हे शेतकऱ्यांचेही खरे नेते होते. मुंबई विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढला. कोकणातील ‘खोत’ पद्धतीविरोधात लढा देत त्यांनी हजारो एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिली.
कामगारांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, कायम नोकरी (पर्मनंट जॉब), वेतन निश्चिती, महागाई भत्ता, विविध प्रकारच्या रजा आणि कामगारांचे अधिकार यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा त्यांच्या कायदेशीर तरतुदींमुळेच आज उपलब्ध आहेत. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे वारसा हक्क, सुरक्षितता आणि समानतेचे अधिकार दिले. तसेच प्रसूती रजा, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता यांसारख्या सुविधा देखील त्यांच्या कार्याचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन ‘रयतेचे राज्य’ उभारले. तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान आणि विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचले. करण थोरात यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे.” त्यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेवटी, त्यांनी सांगितले की, जयंती साजरी करण्याबरोबरच प्रत्येकाने काहीतरी सकारात्मक संकल्प करून समाजासाठी योगदान द्यावे. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे महिलांना समान हक्क - प्राची ठाकरे
आयोजित जयंती कार्यक्रमात ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून आपले विचार व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत महिलांसाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, महिलांच्या शिक्षणासाठी आणि समान हक्कांसाठी बाबासाहेबांनी ऐतिहासिक काम केले, जे आजही अनेकांना पूर्णपणे माहित नाही. मनुस्मृतीतील अन्यायकारक तरतुदींवर टीका करत त्यांनी सांगितले की, त्या काळात शूद्र आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता. या विषमतेविरोधात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक न्यायाचा संदेश दिला.
तसेच गोलमेज परिषदेत (Round Table Conference) सहभागी होताना बाबासाहेबांनी दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, असे त्यांनी नमूद केले. मात्र सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना ही भूमिका बदलावी लागली, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या हक्कांसाठी हिंदू कोड बिल हे मोठे पाऊल ठरल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्यामुळे महिलांना संपत्ती हक्क, विवाहातील समानता आणि सन्मानाचे स्थान मिळाले. एका पुरुषाने पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करू नये, अशी महत्त्वाची तरतूदही या कायद्यामुळे लागू झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, त्यांनी सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार केले. त्यामुळेच आजही भारताची राज्यघटना सक्षमपणे कार्यरत आहे. तसेच ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, १९४२ ते १९४६ या काळात कामगार मंत्री असताना त्यांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली. दामोदर व्हॅली प्रकल्प, १९४८ चा विद्युत पुरवठा कायदा आणि राष्ट्रीय वीज जाळ्याची संकल्पना त्यांनी मांडली. शेवटी, ठाकरे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इतके व्यापक आहे की ते शब्दात मांडणे कठीण आहे. त्यांनी त्यांच्या कार्याला शतशः नमस्कार करून सर्वांना त्यांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले.
पांडुरंग गायके यांचे आवाहन : बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली
संयुक्त जयंती कार्यक्रमात पांडुरंग गायके यांनी प्रभावी शब्दांत उपस्थितांना संबोधित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांना संबोधित करत त्यांनी सर्वांना एकाग्रतेने कार्यक्रम ऐकण्याचे महत्त्व पटवून दिले. गायके यांनी सांगितले की, कठीण परिस्थितीतही बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष करत समाजाला हक्क व सन्मान मिळवून दिला. “आपण केवळ काही तास कार्यक्रमात बसतो, पण बाबासाहेबांनी आयुष्यभर अन्याय सहन करून समाजासाठी कार्य केले,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान वातावरणात उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांनी घोषणाबाजी करत उपस्थितांना प्रेरित केले. गायके यांनी सांगितले की, सर्व वक्त्यांनी महापुरुषांच्या विचारांची देवाणघेवाण केली असली तरी आता त्या विचारांचे आचरण करण्याची वेळ आली आहे. “आपण काय करतो, कसे वागतो आणि समाजासाठी काय योगदान देतो, याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या संदर्भात बोलताना त्यांनी नमूद केले की, बाबासाहेबांनी दिलेल्या या अधिकाराचा उपयोग करून समाजातील मागासलेल्या घटकांना पुढे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. “नोकरीत आलेल्या प्रत्येकाने समाजाचे प्रतिनिधित्व करत इतरांना उभे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,” असे त्यांनी आवाहन केले. तसेच अन्यायाविरोधात अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करण्याचा संदेश देत त्यांनी बाबासाहेबांच्या शिकवणीचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाला मिळालेली ताकद, ऊर्जा आणि अधिकार हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी, त्यांनी काव्यात्मक शैलीत बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांना भावनिक संदेश दिला. “बाबासाहेबांच्या विचारांना आचरणात आणून एकमेकांना सहकार्य करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप “जय हिंद, जय भारत, जय भीम” या घोषणांनी केला.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण हीच खरी जयंती - संजय कटारनवरे
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय कटार यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी उशिरा उपस्थित राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, फाउंडेशनच्या वतीने आयोजित अंध बांधव-भगिनींच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे त्यांना उशीर झाला. तरीही या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय कटार यांनी सांगितले की, काल उल्हासनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचा आणि आजच्या डोंबिवलीतील कार्यक्रमाचा अनुभव घेताना बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण प्रत्यक्षात होत असल्याचे दिसून येते. “बाबासाहेबांनी दिलेले विचार आपण प्रत्यक्ष कृतीत उतरवत आहोत, हे पाहून समाधान वाटते,” असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे समाजात जागृती निर्माण होते आणि एकत्रितपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी आपल्या बहुजन विकास कर्मचारी संघटना तसेच कुटुंबीयांच्या वतीने सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी, “बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करत राहणे आणि त्यांचे आचरण करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला.
महामानवांच्या विचारधारेतच शांतता व प्रगतीचा मार्ग - ग्यानेश पानपाटील
आयोजित जयंती कार्यक्रमात कार्यकारी अभियंता ग्यानेश पानपाटील यांनी प्रभावी मार्गदर्शन करत महापुरुषांच्या विचारधारेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सुरुवातीला कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि दरवर्षी सातत्याने हा कार्यक्रम घेतला जात असल्याचे ‘निष्ठेचे उदाहरण’ असल्याचे नमूद केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट केली.
पानपाटील यांनी सांगितले की, आजच्या बदलत्या काळात आणि वाढत्या तणावात शांततेसाठी आणि योग्य जीवनासाठी महामानवांच्या विचारधारेची अत्यंत गरज आहे. त्यांनी भगवान बुद्ध यांच्या धम्माच्या तत्त्वांचा उल्लेख करत सांगितले की, निसर्गाच्या नियमांचे पालन आणि आत्मपरीक्षण यामुळेच खऱ्या अर्थाने समाधान मिळू शकते. इतिहासात अनेक वेळा महापुरुषांचे विचार दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. सम्राट अशोक यांचा इतिहासही काही काळ लपवला गेला होता, तसेच संत परंपरेने या विचारांना पुढे नेण्याचे कार्य केले, असे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी शिक्षणासाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. समाजातील अज्ञान आणि अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणि सन्मान दिला, तर शाहू महाराजांनी आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची अंमलबजावणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्व विचारांना संविधानाच्या माध्यमातून कायदेशीर बळ दिले, असे त्यांनी स्पष्ट केले. “शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले, फुलेंनी शिक्षण दिले आणि बाबासाहेबांनी संविधान दिले – ही आपल्या समाजासाठी अमूल्य देणगी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. शेवटी, पान पाटील यांनी सांगितले की, महापुरुषांचे कार्य इतके विशाल आहे की ते शब्दात मांडणे कठीण आहे. त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. “जय भीम, जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
डॉ. बाबासाहेबांचे विचार वाचनातून आणि आचरणातून रुजवा - संजय मोरे
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस संजय मोरे साहेब यांनी जयंती कार्यक्रमात प्रभावी भाषण करत सामाजिक जागरूकतेचा आणि कृतीचा संदेश दिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. संजय मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महापुरुषांचे विचार केवळ ऐकून चालणार नाहीत, तर ते वाचून आणि आचरणात आणणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी विशेषतः महिलांना आवाहन करत हिंदू कोड बिल वाचण्याचे आवाहन केले. “महिलांना मिळालेले अनेक अधिकार हे बाबासाहेबांच्या संघर्षाचे फळ आहेत, त्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, आरक्षण हा केवळ लाभ नसून सामाजिक प्रतिनिधित्वाचा अधिकार आहे. “आरक्षणाच्या माध्यमातून नोकरीत आलेल्या प्रत्येकाने समाजातील मागास घटकांना पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, संविधानातील कलम ३४० चा उल्लेख करत त्यांनी ओबीसी समाजासाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. संजय मोरे यांनी संघटनात्मक कार्यावरही भाष्य करत सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने संघर्ष करत आहेत. “आपण नोकरीत आहोत, यामागे कोणीतरी संघर्ष करत आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. विविध संघटनांमध्ये समन्वय आणि एकजूट आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, “कार्यस्थळी महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” त्यांच्या संघटनेत महिलांविषयी आदर आणि समानतेचे मूल्य रुजवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी, त्यांनी सर्वांना आवाहन केले की, “बाबासाहेबांना खरी आदरांजली द्यायची असेल, तर त्यांचे साहित्य वाचा, विचार समजून घ्या आणि आपल्या जीवनात प्रामाणिकपणे त्यांची अंमलबजावणी करा.” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि आपल्या मनोगताचा समारोप केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समता, न्याय आणि संविधानाचे शिल्पकार - अण्णासाहेब काळे (कार्यकारी अभियंता डोंबिवली विभाग)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाला मजबूत लोकशाही दिली. त्यांनी शिक्षण, समता आणि बंधुता यांचा संदेश समाजाला दिला. समाजातील अन्याय, विषमता आणि भेदभावाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्य अतुलनीय आहे. कामगार, शेतकरी आणि वंचित घटकांसाठी त्यांनी कायदेशीर हक्क निर्माण केले. त्यांनी “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश दिला. त्यांच्या विचारांमुळे आज प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे आचरण करून समाज प्रगत करणे आवश्यक आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित चिले, अविनाश मोरे, सचिन राऊत, भागीरथ चव्हाण, प्रदीप म्हात्रे, सचिन पेंढारकर, निलेश सानप, सागर मयेकर, पियुष विसपुते, विनायक राठोड आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.







































































































