समाज एकता, संस्कृती संवर्धन आणि युवकांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
नांदेड : राष्ट्रीय बंजारा परिषद आयोजित भव्य अधिवेशन नांदेड येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या पावन उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक आणि सामाजिक उंची प्राप्त झाली. समाजातील विविध स्तरांतील मान्यवर, पदाधिकारी, महिला, युवक आणि समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले.
अधिवेशनाचे नेतृत्व धर्मनेते किसनभाऊ राठोड यांनी केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी समाज एकता, संस्कृतीचे जतन आणि युवकांच्या सशक्त भविष्यासाठी एकजुटीची गरज अधोरेखित केली. समाजातील प्रत्येक घटकाने संघटित राहून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात विलासभाऊ राठोड, डॉ. मोहनभाऊ चव्हाण, एम. पी वडकुते, बलविंदर बाबा जी, उमेशभाऊ राठोड, श्रावणभाऊ, अर्जुन नायक, श्रीमंतभाऊ, राजेश पवार तसेच निर्मला आढे यांची विशेष उपस्थिती लाभली. महिला व युवक पदाधिकाऱ्यांचा सहभागही उल्लेखनीय ठरला.
अधिवेशनामध्ये समाजहिताच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजामध्ये वाढत असलेल्या लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. समाजातील युवकांनी जागरूक राहून आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
यावेळी गोरबोली भाषेला शासकीय मान्यता मिळावी, यासाठी एकमुखी मागणी करण्यात आली. बंजारा समाजाची भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच गोरक्षा, शिक्षण, रोजगार आणि युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजाने संघटित होण्याची गरज मान्यवरांनी अधोरेखित केली.
समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरही अधिवेशनात ठोस भूमिका मांडण्यात आली. तसेच आरक्षण आणि समाजाचे राजकीय सक्षमीकरण आणि हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “चलो गोर राजसत्ता की ओर” या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थित युवकांनी घोषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाज एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान डॉ. मोहनभाऊ चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढले.
अधिवेशनात समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करून भविष्यात अधिक संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. महिला, युवक आणि ज्येष्ठ समाजबांधवांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला.
राष्ट्रीय बंजारा परिषद अधिवेशनामुळे समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून समाज एकता आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.