चाळीसगावच्या आरोग्यदूतांनी गिरवले ‘जीवनरक्षणाचे’ धडे; IMA चा अभिनव उपक्रम यशस्वी!

 

शंभरहून अधिक पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी घेतला ‘COLS’ प्रशिक्षणाचा लाभ; 

यमराजालाही वेशीवरच रोखण्याचा निर्धार!

चाळीसगाव : “एका हाताची साथ, लाखो आयुष्यांची आस” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत IMA चाळीसगाव शाखेच्या वतीने आयोजित ‘COLS (CPR) प्रशिक्षण कार्यशाळा’ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. स्थानिक IMA हॉलमध्ये झालेल्या या ऐतिहासिक उपक्रमात चाळीसगाव शहर व परिसरातील विविध रुग्णालयांतील १०० हून अधिक आरोग्यसेवक (Paramedical Staff) यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

  तज्ज्ञांचे अमूल्य मार्गदर्शन

     कार्यक्रमाच्या वैज्ञानिक सत्रात धुळे आणि चाळीसगाव येथील अनुभवी तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धुळे येथून विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉ. योगेश बोरसे, डॉ. अमित पाटील आणि डॉ. समीर शिंदे यांनी प्रशिक्षणार्थींना ‘COLS (Compression-Only Life Support)’ विषयी सखोल आणि तांत्रिक माहिती दिली.

    हृदयविकाराचा झटका आल्यावर वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा काळ किती महत्त्वाचा असतो, तसेच त्या दरम्यान छातीवर द्यावयाच्या दाबाचे (Chest Compressions) तंत्र कसे असावे, याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.

     यावेळी डॉ. जयवंत देवरे, डॉ. सौ. उज्वला देवरे, डॉ. अमित जैन, डॉ. अभिजित पाटील आणि डॉ. अनुप परमार यांनी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी ‘Compression-Only Life Support’ किती महत्त्वाचे आहे, हे अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केले. प्रत्यक्ष डमीवर प्रात्यक्षिके करून त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन केले.

  स्थानिक भूलतज्ज्ञांचा सक्रिय सहभाग

     या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे चाळीसगावमधील नामवंत भूलतज्ज्ञांचा सक्रिय सहभाग. डॉ. सौ. सुलभा साळुंखे, डॉ. सौ. यशश्री महाजन, डॉ. अनिकेत राखुंडे आणि डॉ. भूषण पाटील यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून प्रत्यक्ष सराव करून घेत तांत्रिक बारकावे समजावून सांगितले. त्यामुळे सहभागींचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला.

उत्साही वातावरण आणि नियोजनबद्ध आयोजन

   कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि नेटके सूत्रसंचालन डॉ. अमित महाजन आणि डॉ. मंगेश वाडेकर यांनी केले.

    IMA चे अध्यक्ष डॉ. पंकज निकुंभ आणि सचिव डॉ. लीना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.

कृतज्ञता आणि गौरव

     या अभिनव कार्यशाळेची संकल्पना डॉ. सुनील राजपूत आणि डॉ. मंगेश वाडेकर यांची होती. डॉ. सुनील राजपूत यांनी सांगितले की, “Golden Hour Treatment म्हणजे काय, ती किती वेळ आणि कशा पद्धतीने करायची, हे समाजापर्यंत पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वसामान्य नागरिक, रुग्णवाहिका चालक, नर्सेस आणि आरोग्यसेवकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.”

तर डॉ. मंगेश वाडेकर म्हणाले की, “प्रत्येकाला जीव वाचवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कोणतीही पदवी किंवा प्रमाणपत्र आवश्यक नसते. विशेषतः महिला आणि मुलींनीही जीवनसंजीवनी देण्यासाठी पुढे आले पाहिजे.”

कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व १०० प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते ‘COLS प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात आले.

आभार प्रदर्शन करताना डॉ. पंकज निकुंभ म्हणाले, “अशा प्रशिक्षणांमुळे चाळीसगावची आरोग्यसेवा अधिक सक्षम झाली असून, आता आमचा स्टाफ कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाला जीवदान देण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या काळात हे प्रशिक्षण समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचवण्याचा IMA चाळीसगावचा मानस आहे.”

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण चाळीसगाव वैद्यकीय क्षेत्रातून ‘टीम IMA’चे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post