IMA च्या पुढाकारातून आपत्कालीन रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याचा उपक्रम
चाळीसगाव : रुग्णसेवेत डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफला आपत्कालीन परिस्थितीत अधिक सक्षम करण्यासाठी इंडियन Medical Association (IMA), चाळीसगाव शाखेतर्फे प्रथमच विशेष ‘जीवनरक्षक’ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १० मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता आय.एम.ए. हॉल येथे ‘COLS (CPR) प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण’ कार्यशाळा पार पडणार आहे.
हृदयविकाराचा झटका किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर पोहोचण्यापूर्वीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या ‘गोल्डन मिनिट्स’मध्ये योग्य उपचार देऊन रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या Compression-Only Life Support (COLS) तंत्राचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या नर्स, ब्रदर व असिस्टंट यांना डमीवर प्रत्यक्ष ‘हँड्स-ऑन’ सराव करून घेण्यात येणार आहे. तसेच धुळे व चाळीसगाव येथील अनुभवी भूलतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आय.एम.ए.तर्फे अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
चाळीसगावच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारचे व्यापक प्रशिक्षण आरोग्य सेवकांसाठी आयोजित करण्यात येत असल्याने या उपक्रमाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. कार्यशाळेची संकल्पना डॉ. सुनील राजपूत आणि डॉ. मंगेश वाडेकर यांची असून, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. पंकज निकुंभ व सचिव डॉ. लीना पाटील यांनी परिसरातील सर्व खाजगी व शासकीय रुग्णालये तसेच क्लिनिकमधील डॉक्टरांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी सहभागी करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
या अभिनव उपक्रमामुळे चाळीसगाव तालुक्यातील आपत्कालीन रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास आय.एम.ए. चाळीसगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. पंकज निकूंभ, सचिव डॉ. लीना पाटील, उपाध्यक्ष डॉ. अनुप परमार, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. अमित महाजन तसेच ‘टीम आय.एम.ए.’ने व्यक्त केला आहे.