प्रतिकूलतेवर मात: इस्राएलचे 'अपयशाकडून यशाकडे' नेणारे गुपित - विरेंद्र सोनवणे


        भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक अत्यंत लहान देश, ज्याची लोकसंख्या आणि भूभाग आपल्या देशातील एखाद्या लहान राज्यापेक्षाही कमी आहे, तो आज जागतिक पटलावर तंत्रज्ञान, शेती आणि सुरक्षेच्या क्षेत्रात महासत्ता म्हणून ओळखला जातो. तो देश म्हणजे इस्राएल. भौगोलिक दृष्ट्या पाहिल्यास इस्राएलकडे अभिमान बाळगावा अशी कोणतीही अनुकूलता नाही. निम्म्याहून अधिक भूभाग वाळवंटाने व्यापलेला, नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड अभाव, पाण्याचा प्रत्येक थेंब मोजून वापरावा लागेल अशी भीषण परिस्थिती आणि जन्मापासूनच सभोवतालच्या शेजारी राष्ट्रांकडून असलेल्या सततच्या सुरक्षा आव्हानांचा वेढा, अशा प्रतिकूलतेच्या चक्रव्यूहात हा देश कायम अडकलेला असतो. जगातील कोणत्याही सामान्य देशासाठी या मर्यादा देशाच्या विनाशासाठी पुरेशा ठरल्या असत्या. परंतु, इस्राएलने या सर्व मर्यादांना आणि प्रत्येक संकटाला आपल्या प्रगतीची पायरी बनवले. या चमत्कारामागे कोणतेही जादूचे कोंदण नाही, तर या छोट्या देशाचे एक गुपित वैशिष्ट्य दडलेले आहे आणि ते म्हणजे अपयशाला थेट संधीमध्ये बदलणारी त्यांची राष्ट्रीय मानसिकता. संकटात रडत न बसता, त्या संकटावर मात करण्यासाठी बुद्धिचातुर्य वापरणे हा या मानसिकतेचा मूळ गाभा आहे.

     या राष्ट्रीय मानसिकतेची पाळेमुळे इस्राएलच्या शिक्षण पद्धतीत आणि संशोधन संस्कृतीत अतिशय खोलवर रुजलेली आहेत. तिथल्या शिक्षण व्यवस्थेत मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान किंवा घोकंपट्टी शिकवली जात नाही, तर प्रश्न विचारण्याचे आणि प्रस्थापित नियमांना आव्हान देण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. इस्राएलमध्ये अपयशाला कलंक मानले जात नाही, तर तो प्रयोगाचा एक भाग आणि यशाची पहिली पायरी म्हणून स्वीकारला जातो. शाळा असो, विद्यापीठे असो वा संशोधन संस्था, तिथे नवनवीन कल्पना मांडण्यासाठी आणि धाडसी प्रयोग करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन दिले जाते. जर एखादा प्रयोग अपयशी ठरला, तर त्याला शिक्षा करण्याऐवजी किंवा त्याचे खच्चीकरण करण्याऐवजी, त्या अपयशाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले जाते. 'आपण कुठे चुकलो आणि पुढच्या वेळी यात काय सुधारणा करता येईल' हा विचार तिथे अगदी प्राथमिक स्तरापासून रुजवला जातो. याच कारणांमुळे आज हा देश जागतिक स्तरावर 'स्टार्ट-अप नेशन' म्हणून ओळखला जातो, जिथे प्रतिव्यक्ती संशोधकांचे आणि नवीन उद्योगांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

   उद्योजकतेच्या क्षेत्रात तर इस्राएलची ही मानसिकता जगभरातील अभ्यासकांसाठी कौतुकाचा विषय ठरली आहे. इस्राायली उद्योजक जेव्हा एखादा नवा व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्यांना अपयशाची अजिबात भीती नसते. तिथल्या गुंतवणूकदार कंपन्याही अशा तरुणांवर पैसे लावायला तयार असतात, ज्यांचे यापूर्वीचे एक किंवा दोन उद्योग अपयशी ठरले आहेत. कारण तिथे असे मानले जाते की, एकदा अपयशी ठरलेल्या माणसाकडे 'व्यवसाय कसा करू नये' याचा प्रत्यक्ष आणि अत्यंत मोलाचा अनुभव असतो, जो कोणत्याही विद्यापीठात शिकवला जात नाही. या विचारसरणीमुळे तिथल्या तरुणांमध्ये जोखीम पत्करण्याची म्हणजेच रिस्क घेण्याची प्रचंड क्षमता निर्माण झाली आहे. आज सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय उपकरणे आणि अंतराळ तंत्रज्ञानात इस्राएलने मारलेली झेप याच निडर उद्योजकतेचे फलित आहे.

    शेती आणि जलव्यवस्थापन या क्षेत्रातील इस्राएलची प्रगती तर मानवी जिद्दीचे आणि विज्ञानाचे अजोड उदाहरण आहे. ज्या देशात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते आणि शेतीयोग्य जमीन उपलब्ध नव्हती, त्या देशाने पाण्याच्या टंचाईलाच आपले बलस्थान बनवले. इस्राएलने समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान विकसित केले. आज हा देश आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील तब्बल नव्वद टक्के पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी करतो, हा एक जागतिक विक्रमच आहे. एवढेच नव्हे, तर पिकांच्या मुळाशी थेट मोजून पाणी देण्याची 'ठिबक सिंचन' पद्धत याच देशाने शोधून काढली आणि वाळवंटात फळे आणि फुलांचे नंदनवन फुलवले. अन्नधान्या बाबतीत परावलंबी असणारा हा देश आज युरोपला मोठ्या प्रमाणात शेती उत्पादनांची निर्यात करतो. निसर्गाने दिलेल्या अपयशी परिस्थितीला तंत्रज्ञानाच्या जोरावर अनुकूलतेत कसे बदलायचे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

    या संपूर्ण प्रगतीचा कणा आहे तिथली राष्ट्रीय कर्तव्यभावना आणि देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक नागरिकाचे असलेले योगदान. इस्राएलमध्ये प्रत्येक तरुण-तरुणीला ठराविक काळासाठी लष्करी सेवा बजावणे कायद्याने बंधनकारक आहे. या लष्करी शिक्षणामुळे तिथल्या नागरिकांमध्ये शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्वगुण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतही शांत डोक्याने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. सैन्यातून बाहेर पडल्यानंतर हेच तरुण जेव्हा नागरी जीवनात किंवा उद्योजकतेत पदार्पण करतात, तेव्हा ते कोणत्याही संकटाने डगमगत नाहीत. संकट समयी संपूर्ण देश मतभेद बाजूला ठेवून एका भिंतीसारखा उभा राहतो, कारण त्यांची राष्ट्रीय कर्तव्यभावना वैयक्तिक स्वार्थापेक्षा नेहमीच मोठी असते.

     इस्राएलच्या या प्रवासातून भारत आणि जगातील इतर विकसनशील देशांना शिकण्यासारखे खूप काही आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या, अथांग नैसर्गिक साधनसंपत्ती आणि अफाट तरुण मनुष्यबळ असलेल्या देशासाठी तर हे धडे अत्यंत दिशादर्शक ठरू शकतात. आपल्याकडे अजूनही अपयशाकडे एक सामाजिक कलंक म्हणून पाहिले जाते, ज्यामुळे अनेक तरुण नव्या कल्पना राबवण्यास किंवा उद्योग सुरू करण्यास घाबरतात. ही मानसिकता बदलून शैक्षणिक संस्थेपासूनच प्रयोगात्मकतेला आणि नवकल्पनांना वाव देणारे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. शेतीप्रधान देश असूनही आपल्याकडे पाण्याचे अयोग्य नियोजन आणि हवामानातील बदलांमुळे शेतकरी अडचणीत येतो. अशा वेळी इस्राएलचे कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापनाचे मॉडेल आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार अंगीकारू शकतो. संकटे ही केवळ अडथळे नसतात, तर त्या स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या आणि नवनिर्मितीच्या मोठ्या संधी असतात, हा इस्राएलचा धडा आजच्या जागतिक परिस्थितीत प्रत्येक देशासाठी मार्गदर्शक आहे. राजकीय मतभेद किंवा भौगोलिक मर्यादा बाजूला ठेवून, केवळ मानवी इच्छाशक्ती आणि विज्ञानाच्या बळावर राष्ट्र कसे उभे राहू शकते, हेच या देशाच्या मानसिकतेने जगाला दाखवून दिले आहे.

 - विरेंद्र सोनवणे, जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post