ठाणे : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय आणि ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कृती आणि वारकरी परंपरेचे संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिंडीची सुरुवात भक्तिमय वातावरणात मनमोहक भजनांनी झाली. यावेळी चित्रकला शिक्षक श्री. योगेश पंडित यांनी साकारलेली १२ फूट उंचीची भगवान विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा सर्वांचे विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक सजावटीने नटलेल्या या सोहळ्याने उपस्थितांचे मन जिंकले.
आनंद विश्व गुरुकुलच्या प्रांगणातून प्रारंभ झालेली ही दिंडी दत्ता मंदिर, चेक नाका, ठाणे येथे भक्तिभावाने संपन्न झाली. संपूर्ण मार्गावर "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल" च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
दिंडीत कनिष्ठ महाविद्यालय, ज्येष्ठ रात्र महाविद्यालय, एन.सी.सी. आणि एन.एस.एस. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थिनी नऊवारी व पारंपरिक साड्यांमध्ये तर विद्यार्थी पारंपरिक पोशाखात अतिशय देखणे दिसत होते. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी लेझीम, दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक क्रीडा व सांस्कृतिक कलांचे उत्कृष्ट सादरीकरण तसेच सामाजिक जनजागृती करणारे प्रभावी पथनाट्यही विद्यार्थ्यांनी सादर केले, ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिस्त, उत्साह आणि भक्तिभाव यांचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
या भक्तिमय सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास ठुसे , सचिव डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, खजिनदार श्री. अक्षर परसनीस , आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या व विश्वस्त डॉ. हर्षला लिखिते , आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. संपदा कुलकर्णी , आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. सुयश प्रधान तसेच आनंद विश्व गुरुकुल प्री-प्रायमरी व सेकंडरी स्कूलच्या प्राचार्या डॉ. वैदेही कोलंबकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याशिवाय संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी झाले. सर्वांनी एकत्र येऊन वारकरी परंपरेचे जतन करत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.
या दिंडी सोहळ्यामुळे आनंद विश्व गुरुकुलच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचे संवर्धन करण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.



















