ठाणे : कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. संपूर्ण देशात २६ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कारगिल विजय दिवस’ देशभरात साजरा करण्यात येतो. याच दिवशी भारतीय सैन्याच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरित परिस्थितीत शत्रूसैन्याला नामोहरम केले.
कारगिलच्या शहिदांचे नागरिक सन्मानाने स्मरण करण्याबरोबरच, देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो. देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात येत असते. भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.
आज ठाण्यातील शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत, कॅप्टन सुरेश वंजारी यांच्या उपस्थितीत २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर पारसनीस, विश्वस्त व जेष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, सेकंडरी व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. सुयश प्रधान, प्रायमरीच्या प्राचार्या डॉ. वैदही कोळंबकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. मयुरी पेंडसे, कौशल्य विकासच्या प्रमुख सौ. मयुरा गुप्ते, सौ. सुनीता वंजारी मॅडम, सौ. शिल्पा खेर मॅडम, व्यवस्थापनाचे अन्य सदस्य, एनसीसी प्रमुख प्रा. धनश्री गवळी, उप-प्राचार्या प्रा. दिपीका तलाठी, पर्यवेक्षक प्रा. सागर जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कॅप्टन सुरेश वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्याला आपल्या देशातील सैन्याचा अभिमान वाटला. सगळेच भारावून गेले होते.
ते आपल्या मनोगतात असे म्हणाले, कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशासह देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. त्यावेळी आपले सैनिक स्वत:सह कुटुंबाचाही विचार करीत नाही, फक्त देशाचाच विचार करतात. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणे हे आपले सामाजिक कर्तव्यच आहे.