कल्याण : (सतिष एस राठोड) - खारघर येथे हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर जी ३५० वॉ शहीदी समागम २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून संत समागम व संबंधित नियोजन बैठक शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी मातृश्री शामाबाई लोहाणा महाजनवाडी ट्रस्ट, कल्याण येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत विविध वारकरी संप्रदाय, शीख संप्रदाय तसेच संत-समाजातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी संत समागम, अखंड गुरुग्रंथ साहिब पारायण तसेच दिंडी सोहळ्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम सुरळीत, शिस्तबद्ध आणि भव्य पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीदरम्यान समाजातील ऐक्य, धार्मिक सौहार्द आणि सेवाभाव अधिक दृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला. सर्व उपस्थितांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीच्या आयोजन समितीचे समन्वयक प.पू. महंत श्री चिदानंदजी सरस्वती महाराज, कैलास तंवर, भावेश मोरे, दिनेश देशमुख यांच्या वतीने आगामी कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

