मनसेतर्फे सामाजिक उपक्रम; शाळांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांविरोधात ठाम भूमिका – माधवी शेट्ये
टिटवाळा : (प्रतिनिधी - अशोकराव चव्हाण) : कल्याण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टिटवाळा येथील KNT पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या सुमारे ९०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने आयोजित या सामाजिक उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक उल्हास दादा भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे कार्याध्यक्ष रोहन अक्केवार, मनसे महिला शहर संघटक माधवी शेट्ये, शहापूर विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष पायल शाह तसेच समाजसेविका प्रियांका देठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी KNT पब्लिक स्कूलचे संचालक सतीश तिवारी, मुख्याध्यापिका माधवी गायकवाड यांच्यासह ॲड. नितीन सोनवणे, ॲड. महेश गायकवाड, कैलास पारधी, गिरीश यशवंतराव, मिलिंद ठाकरे, कल्पेश कबरे, सुरेखा जोशी, सोनाली पगारे, सागर चौधरी, अनिकेत म्हात्रे तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना माधवी शेट्ये यांनी KNT पब्लिक स्कूलच्या २५व्या वर्षात पदार्पणाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. टिटवाळा परिसरातील शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करीत असून, अशा संस्थांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा किंवा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाळांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उल्हास दादा भोईर यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, उत्तम नागरिक बनावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या उपक्रमाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे कल्याण-डोंबिवली उपाध्यक्ष ॲड. अविनाश शिळकंदे आणि महाराष्ट्र सैनिक तथा विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप राठोड हे होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल उपस्थित मान्यवर, पालक आणि शाळा व्यवस्थापनाने आयोजकांचे कौतुक केले.

