‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार’ राजभवन येथे प्रदान
मुंबई : नोकरी, स्वयंरोजगार व उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टीने मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधण्यात यावीत, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. या कार्यात कॉर्पोरेट्स व उद्योग संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
राज्यपाल बैस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.१९) ‘नवभारत’ वृत्तपत्र समूहातर्फे देण्यात येणारे ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार’ राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी, हिंदुजा रिन्युअल्सचे अध्यक्ष शोम हिंदुजा, युवराज ढमाले, समूहाचे अध्यक्ष युवराज ढमाले व उद्योग जगतातील प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, सर्व शहरांमध्ये, गर्दीच्या भागांमध्ये आणि विशेषतः रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहे बांधावीत, सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प बांधावे तसेच प्रत्येक व्यावसायिक व उद्योग समूहांमध्ये युवकांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याच्या संधी निर्माण कराव्यात, अशाही सूचना राज्यपालांनी यावेळी उद्योग जगताला केल्या.
कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाइतकेच वैयक्तिक सामाजिक दायित्व देखील महत्त्वाचे असल्याचे सांगताना राज्यपालांनी रायपूर येथे एका भाजी विक्रेत्या महिलेने तेथील जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांसाठी स्वखर्चाने निवाऱ्याची व्यवस्था केल्याचे सांगितले.
मुंबई शहरातील जेजे रुग्णालय, जेजे स्कूल ऑफ आर्ट, गेट वे ऑफ इंडिया, माहिम कॉजवे यांच्या निर्मितीमध्ये देखील दानशूर लोकांनी योगदान दिल्याचे सांगून राज्यपालांनी आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या दातृत्वाचे स्मरण केले.
राज्यातील वीस हजार गावांचे संपूर्ण परिवर्तन करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आपण मुख्यमंत्री असताना कॉर्पोरेट्सच्या मदतीने राज्यातील एक हजार गावांचे आदर्श गाव म्हणून परिवर्तन केले असल्याचे सांगून आगामी काळात राज्यातील २० हजार गावांचे सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासन विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यात कॉर्पोरेट व उद्योग समूहांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे सांगून सीएसआर अंतर्गत कोणतेही उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी शासन कॉर्पोरेट्स व उद्योग समूहांना निश्चितपणे मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नवभारत वृत्तपत्र स्थापनेच्या ९० व्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते यावेळी नवभारत वृत्तपत्राच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. निमिष माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदित्य बिर्ला शिक्षण न्यासाच्या अध्यक्ष डॉ नीरजा बिर्ला, गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादिर गोदरेज, बजाज फाउंडेशनचे अपूर्व बजाज, रायन समूहाच्या अध्यक्ष ग्रेस पिंटो, श्रेया घोडावत, रुबी हॉल क्लिनिकचे परवेझ ग्रांट, वाडिया हॉस्पिटलच्या मिनी बोधनवाला यांसह ५५ उद्योग, शिक्षण व व्यवसाय प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले.