मॉरिशस म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहातो तो म्हणजे अथांग समुद्र, हिरवळ, हनिमून डेस्टिनेशन, मौज मज्जा. माझा मॉरिशसला जाण्याचा योग आला तो म्हणजे १७ वे कोकण मराठी साहित्य परिषदेचे आंतरराष्ट्रीय हृदयंगम साहित्य संमेलनामुळे.पण एक प्रश्न सारखा मनाला भेडसावत होता तो म्हणजे मॉरिशस हाच प्रदेश का ? जो मी ऐकला होता तो ? पण याचे उत्तर मला माॅरिशसच्या लोकांच्या कृतीतूनच मिळाले.
संमेलनाची तारीख ठरली, २ आणि ३ डिसेंबर २०२३. दोन दिवस साहित्य संमेलन होणार होते. मुळात एखादे साहित्य संमेलन आयोजित करणे , ते ही भारताबाहेर करणे आणि १०० साहित्यिकांना घेऊन? तारेवरची कसरतच होती. आयोजन समितीचा मी सुद्धा एक छोटासा भाग असल्या कारणाने पहिल्या दिवसापासून मला हे सगळे बघायला मिळत होते. जणू एक लग्न समारंभाचा मी एक भाग होतो. ! दोन महिने उत्तम नियोजन, शिस्त, अपार मेहनत, खंबीर नेतृत्व, भक्कम पाठिंबा, उत्कृष्ट अशी कार्यक्रमांची आखणी, हे सगळं पार पडून आम्ही २९ तारखेला निघालो आमच्या लग्नसमारंभाला.
म्हणजेच माॅरिशसला. निघेपर्यंत उत्सुकता खूप होती, कसा असेल तो प्रदेश, सुंदर असेलच पण कोकणी माणसाला समुद्र, निसर्ग आणि सुंदरता ह्याचा दैवी देणे असल्यामुळे ह्या गोष्टीचा फारसा मोह नव्हताच. पण उत्सुकता होती ती म्हणजे कोकण मराठी साहित्य संमेलन आणि ते सुद्धा माॅरिशससारख्या पुढारलेल्या देशात. ६ तास प्रवास करून आम्ही माॅरिशस एअरपोर्ट वर पोचलो, माॅरिशसच्या मराठी लोकांनी आमचे जोरदार स्वागत केले. यातील आपुलकी मला राहून राहून जाणवत होती. जणू आपलेच नातेवाईक, आपलीच लोक खूप वर्षांनी आपल्याला भेटली आहेत, असे वाटत होते. पहिलीच भेट मला अचंबित करणारी होती. कारण माॅरिशसमध्ये आम्हाला भेटायला स्वागत करायला आलेली प्रत्येक व्यक्ती हा मराठीत बोलत होता. शुद्ध नसली तरी त्यात प्रेम जिव्हाळा हा ओसंडून वाहत होता. आम्ही माॅरिशससारख्या देशात जायचे म्हणजे चार इंग्रजीचे शब्द तरी आले पाहिजेत नाहीतर फजिती होईल हे डोक्यात ठेऊनच गेलेलो. पण त्याचे हे वागणं अचंबित आणि आश्वासक होते. मराठी भाषेचा जागर आणि प्रचार करायला आम्ही माॅरिशसला आलो आहोत ह्याची जाणीव होती.
पुढे हॉटेलकडचा प्रवास चालू झाला. नजर जाईल तिकडे हिरवळ, छोटे छोटे डोंगर, उसाची लांबच लांब लागवड. सातारा-कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्याचा भास होत होता. खूप समाधानकारक दृश्य होते ते. शेती आणि ऊस लागवड याची बीज ही भारत देशात रुजली गेली होती. शेकडो वर्षाआधी भारतीय लोकांना माॅरिशसमध्ये खास करुन ऊसाच्या शेतीसाठी आणले गेले. ५ वर्ष काहीही संपर्क ठेवायचा नाही कुठलेही आर्थिक व्यवहार ठेवायचे नाही, या अटींवर त्यांना माॅरिशसमध्ये शेती करायला भाग पाडले गेले. त्या कष्टाची आणि मेहनतीची रोपे आज माॅरिशसमध्ये ताठ मानेने ऊसाच्या रूपात उभी असलेली पाहून अभिमान वाटला. मुळात या माॅरिशस देशात पावसाळा असा ऋतूच नसतो. इकडे कधीही पाऊस पडतो पण तरीही इकडची उसाची शेती आणि नजर जाईल तिथपर्यन्त हिरवळ, हे आश्चर्यचकित होतं. हॉटेल वर पोचताच काही दिवस माॅरिशसमध्येच रहावे फक्त हॉटेलचा परिसर न्याहाळावा आणि आनंद घ्यावा इतके मोठे सुरेख सारेच भव्य होते. रूममध्ये आल्यावर हॉटेल स्वीमिंग पूल, निसर्ग याचा मोह आवरत डोकं ठिकाणावर ठेवत आपला माॅरिशसमध्ये येण्याचा हेतू काय ? हे हळूहळू लक्षात आले आणि डोके ताळ्यावर आले. आयुष्यातील पहिले साहित्य संमेलन ज्यात माझा सक्रिय सहभाग होता. आयोजित समिती ते सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मला ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळालेली होती. तशी मला नृत्याची आवड ही शाळा कॉलेज पासूनच होती, पण मग नोकरीच्या दगदगीत हा छंद पुढे जोपासण्याची संधी मिळाली नव्हती. पण नकळत हे साहित्य संमेलन माझ्या आयुष्यात आले आणि इतक्या मोठ्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व मॉरिशसच्या अवकाशात करण्याचे भाग्य सगळ्यांसोबत मलाही मिळाले. या साहित्य संमेलनाची खास बात अशी ही होती की भारतातून जी १०० साहित्यिकांचा समूह आलेला होता ज्यात ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार, नाटककार, दिग्दर्शक, निवेदक, आमदार, पत्रकार अशी आदर्शवत आणि मराठीच्या प्रेमापोटी, संस्कृतीने भारावलेली मंडळी होती. त्यात आम्ही तरुण मंडळी ज्यांना अशा संमेलनाचा फारसा अनुभव नसलेले , पण तरीही हे संमेलन यशस्वी करून माॅरिशसच्या मंडळींनी ज्या विश्वासाने आपल्याला माॅरिशसमध्ये ज्या कारणासाठी बोलावलंय ते प्रामाणिकपणे आणि दणक्यात करायचा असा चंगच बांधून आम्ही सगळे भारतातून निघालेलो. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पीकिंग युनियन मॉरिशस अंतर्गत मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन मॉरिशस मराठी कल्चरल सेन्टर ट्रस्ट यांच्या संयोजनाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ वे कोकण मराठी साहित्य परिषदेचे आंतरराष्ट्रीय हृदयंगमी साहित्य संमेलन संपन्न होत होते.
संमेलनाचा पहिला दिवस २ डिसेंबर २०२३. त्यादिवशी बोर्ड परीक्षेला जाण्यासारखं दडपण होते. सकाळी लवकर उठून खाली नाश्त्याला आलो. पण पोटात भुकेऐवजी फुलपाखराने जागा घेतलेली होती. आता मन शांत होईल ते संमेलन यशश्वी करूनच. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम होता हिंदी सांस्कृतिक हॉल येथे. संमेलनाचा प्रारंभ हा वाजत गाजत विठोबा माऊलीच्या तालासुरात निघालेल्या दिंडीने झाला. माउलींच्या गजराने प्रारंभ झालेली ही दिंडी. पुढे पुस्तक प्रदर्शन आणि मग उद्घाटन समारंभास सुरुवात झाली. प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती , समाधान होते. व्यासपीठावर भारत आणि माॅरिशसचे झेंडे पाहून या दोन देशातला एकोपा दृढ व्हावा, संबंध, वारसा, मराठी भाषा माॅरिशस मध्ये कणखर रित्या उभी आहे याची जाणीव होत होती. जस जसे हे संमेलन पुढे सरकत होतं मला माझ्या पडलेल्या प्रश्नाचा उत्तर मिळत होते की, मराठी साहित्य संमेलन हे माॅरिशसमध्येच का? मुंबई एवढ्या त्या प्रदेशात, ५ % मराठी लोकसंख्या असून इतका मोठा घाट घालून साहित्य संमेलन आयोजित करणे ही मुळात कल्पनाच अलौकिक आहे. कारण तिकडे बहुतांश लोक ही सुद्धा तरुण होती आणि शिस्त, वेळ, काटेकोरपणा, मराठी भाषा, संस्कृती यावरचे त्यांचे प्रेम, माॅरिशसच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, वाढवणे आणि त्याला वाव देणे यासाठी माॅरिशस मधील मंडळी काम करीत होती. अहंकार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नसल्यासारखा, पडेल ते काम अगदी सगळी काम मनापासून करीत होती. नम्रता या शब्दाचा समानार्थी शब्द त्या दवशी मला त्यांना बघून सापडला. त्या दिवशी माझा चार नृत्यात सहभाग होता. माॅरिशस मधल्या तरुणांची ऊर्जा बघून आज त्यांच्यासाठी मनापासून नृत्य करायचे असे मनाशी ठरवूनच मी व्यासपीठावर गेलो आणि शब्दात सांगता येणार नाही असा अनुभव मला त्या दिवशी दवशी मिळाला. परिसंवाद, नृत्य, पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन अश्या मेजवान्यांनी पहिला दिवस सरला. हळद झाली होती आता वेळ होती ती उद्या लग्नाची.
३ डिसेंबर २०२३. दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम हा मराठी भवन येथे होणार होता. सकाळी परत फुलपाखरांना पोटात घेत कार्यक्रम स्थळी गेलो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला बघून अक्षरशः भरून आले आणि जवाबदारीची जाणीव झाली. कारण आज, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित 'स्वराज्य निष्ठा'हे नाटक सादर करायचा होते. त्या नाटकाची सुरवात शाहीर म्हणून मी करणार होतो. महाराजांचे नाटक, समोर साक्षात त्यांची प्रतिमा, बाहेर तुफान पाऊस, वरुण राजा सुद्धा वेळेवर हजर होता, महाराजांना वंदन करायला. परिसंवादाचा पहिले सत्र संपवून आता नाटक चालू झाले. आम्ही सगळेच कलाकार हे व्यक्तिशः स्वतःला विसरून पात्रात गुंग झालो होतो. नाटक संपल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्यांनी आम्हाला आमच्या मूळ रूपात आणले. नाटकाची प्रतिक्रिया ही प्रेक्षकांतून आमच्या प्रर्यंत पोहचत होती. ती खूप सुखावणारी होती. पुढे साहित्यिकांचे खुले व्यासपीठ, परिसंवाद, असे कार्यक्रम करत माॅरिशसच्या लोकांनी आपल्या नृत्याची कलाकृती दाखवत दुग्ध शर्करायोगच साधला. कुठल्याही संमेलनाची अशी सांगता कधी भविष्यात होणे शक्य नाही. अखेर हे दोन दिवसीय कोकण मराठी साहित्य परिषदेचे आंतरराष्ट्रीय ह्रदयंगम साहित्य संमेलनाचे लग्न पार पडले. माॅरिशसची तरुण मंडळी, मराठी लोक, विद्यार्थी यांनी मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची संस्काराची शिदोरी सोबत घेऊन भारतात येतानाचा अनुभव चेहऱ्यवर दिसत होता. हे पाहून एक प्रसिद्ध गाणे ओठावर घोळत होते.
माॅरिशसची मान्स साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी !
पुढचे दिवस होते ते फिरण्याचे, माॅरिशस हा प्रदेश डोळ्यात टिपण्याचे, हा अथांग निळा समुद्र, निळे रंग दाखवणारे पाणी, पांढऱ्या वाळूची किनारपट्टी, ज्वालामुखीचे प्रदेश, छोटे डोंगर, स्वच्छता, सगळ्यात महत्वाचे वेळेचे पालन. हे सगळे मनाच्या कुपीत सांभाळून ठेवत आणि काहीश्या भरलेल्या डोळ्यांनी आम्ही माघारीच्या प्रवासाला निघालो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा कडून परत घरी येतानाचा हा विलक्षण अनुभव पुन्हा एकदा जाणवला.
जय भारत, जय महाराष्ट्र, जय मॉरिशस !