मुंबई : “महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्य पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील” अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विविध उद्योगसमूहांशी सामंजस्य करार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, उद्योजकता आणि नाविन्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी यामुळ उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली असून, हे विद्यापीठ सातत्याने प्रगती करीत आहे. पाच कौशल्य प्रशाला, एकवीस नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याच माध्यमातून अनेक उद्योगसमूहाशी सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. संस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
