नायगाव, दादर (पूर्व) येथील स्प्रिंग मिल कंपाउंड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मेळाव्याला भेट देऊन पाहणी केली.
5 लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात पाच लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात विविध कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.

