वनराजला ‘सह्याद्री फार्म्स’ची साथ
भात, नागली व आंबा ही प्रमुख उत्पादने अग्रस्थानी ठेऊन वनराज शेतकरी उत्पादक कंपनीने वाटचाल पुढे सुरु केली. पारंपरिक पिकांना पर्याय देत अर्थकारण उंचावणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. या वाटचालीत शेतकऱ्यांच्या कंपनीला सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा मोठा हातभार लागला. या भागातील प्रमुख पिक भात असल्याने सह्याद्रीने ‘इंद्रायणी’ वाणाच्या भात खरेदीच्या माध्यमातून काम हाती घेतले. सह्याद्रीने त्यांच्यासोबत करार करून खरेदी केल्याने चालू वर्षी ११० टन भात खरेदी झाली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी उत्पादक कंपनीला सह्याद्रीसारख्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मोठा आधार मिळत असून ही कंपनीसाठी मोठी संधी ठरत आहे.
‘वनराज’ची वाटचाल
जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यात कंपनीचे कार्यक्षेत्र
● खरीप हंगामानंतर स्थलांतरीत होणारी काही कुटुंबे शेतकरी उत्पादक कंपनीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत.
● कृषी पूरक उद्योगातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती होत आहे.
● उत्पादन व विपणन कौशल्य अवगत झाल्याने शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी मिळाल्या आहेत.
● प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील
कंपनीने यशस्वी केलेले शेती प्रयोग:
● १०० एकर क्षेत्रावर मधुमका लागवड करून हमी भावाने विक्री
● २० एकर क्षेत्रावर बेंगलोर मोगरा लागवड : ४० सभासदांचा सहभाग
● १०० महिला व पुरुषांना मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण देऊन उत्पादन सुरु
● १०० एकर क्षेत्रावर भात बीजोत्पादन कार्यक्रम
आगामी उद्देश:
● भात, नागली, वरई या धान्यावर प्रक्रिया करुन उत्पादीत मालाच्या विक्री व निर्यातीवर भर
● आंबा प्रक्रिया उत्पादनासाठी महिलांना सहभाग नोंदवून लघु प्रक्रिया उद्योगाची स्थापना
● सेंद्रिय शेती धान्य, भाजीपाला, फळांचे उत्पादन घेऊन निर्यातीस चालना
● मोगरा व मोह फुलांवर प्रक्रिया उत्पादन
– किरण डोळस, उपसंपादक (जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक)



