मुंबई : महाराष्ट्र शासनाने दिनांक 24 जुलै ते 29 जुलै 2023 हा सप्ताह “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह” म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार राज्यातील एकमेव मुक्त विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मुख्यालयात तसेच, विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रांतर्गत विविध स्पर्धा, तज्ञांची व्याख्याने, वैचारिक लेख इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यापीठ मुख्यालय नाशिक येथे असून तेथील कार्यक्रम मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25, 26 आणि 27 जुलै 2023 रोजी विद्यापीठाच्या ycmou.ac.in या संकेतस्थळावरून विनामूल्य लाईव्ह दाखविले जाणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ समाजातील सर्व थरांतील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी घ्यावा असे मुंबई केंद्राचे विभागीय संचालक, डॉ. वामन नाखले यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
मुंबई विभागाअंतर्गत देखील दि. 26 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता कांदिवली येथील ठाकूर पॉलिटेक्निक, दि. 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता पेण येथील पतंगराव कदम कॉलेज पेण आणि दि. 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी परूळेकर कॉलेज, त्याचप्रमाणे कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गर्ल्स कॉलेज, भिवंडी येथे तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच, पनवेलच्या विसपुते बी.एड. महाविद्यालयातही ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन दिनांक 29 जुलै 2023 रोजी करण्यात येणार असल्याच परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या समाजोपयोगी असलेल्या विविध शिक्षणक्रमांची माहिती देण्यासाठी स्वतः डॉ. वामन नाखले हे सुद्धा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी ड्युएल डिग्री, काम करता करता शिक्षण इ. मुद्द्यांवर ते सविस्तर माहिती देणार आहेत. परिसरातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. नाखले यांनी केले आहे.