आज शिवाजी मंदीर दादर येथे संविधानाचा जागर

आज शिवाजी मंदीर दादर येथे संविधानाचा जागर


मुंबई दि. 26 प्रतिनिधी : उद्या २७ नोव्हेंबरला सोमवारी सकाळी दहा वाजता दादर येथील शिवाजी मंदीर नाट्यगृहात "संविधान प्रेमी कलाकारांचा जागर" ही कलावंतांची परिषद पार पडणार आहे. या परिषदेला उद्घाटक म्हणून मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता किरण माने, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे भैसने, लोकशाहीर संभाजी भगत आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई अध्यक्ष राजा आदाटे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शाहीर संभाजी भगत यांनी दिली.
या परिषदेत पारंपरिक लोक कलांच्या माध्यमातून गाणी आणि नृत्य सादर केले जाणार आहे. "तारफा", " गोंधळ", "भारुड", "रॅप" आणि लोकगीतांच्या चालीवरील गाणी यावेळी सादर केली जाणार आहेत. त्यामाध्यमातू संविधानाचा विचार मांडण्याचा प्रयत्न असल्याचे भगत यांनी सांगितले. गाणारे नवे चेहरे पहायला मिळतील आणि नवी गाणी यावेळी ऐकायला मिळतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार दीपक पवार हे यावेळी करणार आहेत.
मनुस्मृतीचे काळे ढग भारताच्या आसमंतात जमले  असताना  आपण या वर्षीचा संविधान दिन साजरा करत आहोत. या सरकारने संविधानाची अंतर्गत मोडतोड करण्याचे काम बऱ्यापैकी  केले आहे. 2018 साली संविधान जाळून  संविधानाच्या भविष्याची  एक चाचणीही करून घेतली आहे. 2024 ला देशात निवडणूका आहेत. तेव्हा ज्यांना मनुस्मृती नको आहे त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे म्हणून जागे व्हा हे आव्हान करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे भगत म्हणाले.
सांस्कृतिक राजकारण करूनच धर्मांधांनी हा देश ताब्यात घेतला आहे. जर हा देश आणि संविधान धर्ममार्तंडांच्या तावडीतून सोडवायचे असेल तर  शोषित जनतेला आपले पर्यायी संस्कृतीक राजकारण घडवावे लागेल. त्या दिशेने ही परिषद एक पाऊल टाकत आहे, अशी भूमिका त्यांनी याबाबत बोलताना मांडली.

या पार्श्वभूमीवर 27 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 10 ते 2 या कालावधीत  संविधान प्रेमी कलाकार आणि सजग नागरिक मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर येथे  या परिषदेच्या निमत्ताने एकत्र येणार असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post