प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन संपन्न
ठाणे : मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग-व्यवसायांकडून देण्यात येणारा सीएसआर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ज्येष्ठ लेखक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्रकादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक-कवी प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे, किशोर कदम (सौमित्र), कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, शारदा प्रकाशनाचे प्रा. संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संन्यस्त ज्वालामुखी’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘वाचाल तर वाचाल’ असे ट्रकच्या मागे लिहून बिंबवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यात चांगले लेखक आणि वक्ते तयार व्हायला हवेत. हिंदुत्व काय आहे हे जगाला ठासून सांगणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला सांगायला हवेत. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ ही कादंबरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये पोहोचायला हवी, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्राने स्वामी विवेकानंदांवर नेहमीच प्रेम केले आहे. लोकमान्य टिळकांपासून वि. रा. करंदीकरांपर्यंत अनेकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ओळख मराठी समाजाला करून दिली आहे. त्या परंपरेतील स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महाराष्ट्रातील आजचे पाईक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे आहेत, अशा शब्दांत डॉ. सदानंद मोरे यांनी चरित्रलेखक प्रा. डॉ. ढवळ यांचा गौरव केला. तर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, धर्म आणि राजसत्ता यांचे द्वंद्व भारतीय समाजात पूर्वापार आहे. हिंदू धर्म नेमका काय आहे, हे सांगणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. मात्र हिंदू धर्माच्या शोधात स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान भारतातील डाव्या-उजव्या अशा सर्वच विचारसरणींना स्वीकारार्ह वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळे आजच्या पिढीला विवेकानंदांचे विचारच तारू शकतात, अशी भावना डॉ. शोभणे यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी कवी-गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनीदेखील स्वामी विवेकानंदांच्या विचाराची आजच्या पिढीला ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. याबाबत बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भेसळ झाली आहे. विचार, संस्कार, संस्कृती, नीती यांचा विसर पडत चालल्याची परिस्थिती आहे. अशा काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या कादंबरीच्या माध्यमातून आजच्या पिढीपुढे आणण्याचे काम झाले आहे, असे प्रतिपादन प्रा. दवणे यांनी केले. तर कवी-गीतकार व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) याप्रसंगी म्हणाले की, भारतीय समाजातील अनेक महनीय व्यक्तींच्या जीवनविचाराला आध्यात्मिकतेची किनार आहे. याचे कारण त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला, आपला संपूर्ण समाज जाणून घेतला. त्यातूनच त्यांनी आध्यात्मिक विचारांचा संदेश आपल्याला दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनीदेखील आपापला धर्म, स्व-धर्म शोधण्याची प्रेरणा जगाला दिली आहे, असे प्रतिपादन किशोर कदम यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कवी प्रा. अशोक बागवे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मनोगत व्यक्त करून ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकाशनसोहळ्याचे प्रास्ताविक शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी केले, तर प्रा. संतोष राणे यांनी प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कार्यक्रमाचा समारोप गायिका फाल्गुनी नातु यांच्या भैरवी गायनाने झाली, तर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले.