मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह कृषी, ग्रामविकासात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ मध्ये सुधारणा आणत आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने क्रांतिकारक बदल घडवून निश्चितच मानवी जीवन सुसह्य करणे शक्य होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई ही जगाची फिनटेक आणि डाटा सेंटर राजधानी होत आहे. जगातील प्रत्येक भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्याची संधी मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. भारत तंत्रज्ञान व आर्थिक विकासामध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. सध्या जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचा विडा उचलला आहे.
पायाभूत सुविधांची मोठी कामे देशात सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईमधील सागरी किनारा रस्ता, अटल सेतूने दळणवळण गतिमान केले आहे. मुंबईत बरेच पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. राज्य शासन इनोव्हेटिव्ह सोसायटीसाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वांना प्रती वर्ष पाच लाख रुपयांचे विमा कवच देत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला द्रोण दीदी उपक्रमही तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे नेला जात आहे. राज्यात पाण्याच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात २४ हजार गावांमध्ये जलसंपन्नता आली आहे. आय आय टी मुंबई ही आता केवळ एक शैक्षणिक संस्था राहिली नसून ती ‘इंडियन इनोवेशन ऑफ टेक्नॉलॉजी’ बनली आहे. राज्य शासन संशोधनासाठी अनेक क्षेत्रात आयआयटी सोबत काम करीत आहे. द्रोण प्रकल्पासाठी काम सुरू आहे. त्यासाठी कंट्रोल अँड कमांड सेंटर, द्रोण पोर्ट बनविले जात आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवनात आमूलाग्र बदल घडत असून त्यामुळे निश्चितच भविष्य उज्ज्वल होणार आहे.
यावेळी आयआयटीचे संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.