“बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन

नवी मुंबई : “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने नागपूर, नांदेडनंतर आता नवी मुंबई येथे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या महान व्यक्तींचा इतिहास आणि त्यागाची गाथा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन अल्पसंख्यांक आणि औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.

     महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक आणि औकाफ विभाग तसेच गुरु नाम लेवा संगत विविध सामाजिक  संघटनांच्या सहकार्याने ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर नवी मुंबई येथे दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च रोजी  भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आतापर्यंतच्या कामकाजाचा  अल्पसंख्यांक आणि औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी  कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी आणि स्वयंसेवक यांच्याशी संवाद साधत कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली.

     यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितिन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, राज्यस्तरीय समितीचे मुख्य समन्वयक रामेश्वर नाईक, रायगड उप जिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, सुप्रीम कौन्सिल, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य शीख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंग), राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग, हिंद दी चादर कार्यक्रमाचे नवी मुंबईचे सचिव सुखविंदर सिंग ढिल्लन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

     यावेळी हरदिप सिंघ संधु यांच्या संकल्पनेतून तयार केलेले आणि सुप्रसिध्द गायक मन्ना मंड यांनी गायलेल्या “नगारा फतेह दा” या शीख धर्मातील गुरुंच्या शौर्य गाथा सांगणारे चित्रगीताचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

     मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, सरकारने कार्यक्रमाची घोषणा केली असली, तरी समाजातील विविध घटकांनी त्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. अधिकारी आणि स्वयंसेवक एकदिलाने काम करत असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय दिसून येत आहे. 

     यावेळी त्यांनी शीख समाजाच्या अतुलनीय बलिदानाचा विशेष उल्लेख केला. देशाच्या सीमारेषेवर आजही मोठ्या प्रमाणात शीख बांधव कार्यरत असून, त्यांच्या शौर्य व त्यागाची परंपरा प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या. “जो धर्म इतर धर्मांचा आदर करतो, तोच खऱ्या अर्थाने महान ठरतो,” असा सामाजिक एकात्मतेचा संदेशही त्यांनी दिला.

     रायगड जिल्ह्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा संदर्भ देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. अशा पवित्र भूमीत हा कार्यक्रम होत असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमस्थळी लंगर, सुरक्षा, वाहतूक आणि इतर सोयी-सुविधांची केलेली तयारी समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर आणि नांदेड येथील कार्यक्रमांपेक्षा अधिक उपस्थिती अपेक्षित असून, त्यानुसार सक्षम व्यवस्था उभी करण्यात आली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे त्यांनी आभार मानले आणि हा कार्यक्रम राज्यासाठी तसेच देशासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

     आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, “आज संध्याकाळी नगर कीर्तनाने ‘हिंद दी चादर’ समागमाचा भव्य प्रारंभ होत असून, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात अभूतपूर्व समाजसमागम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या सर्व नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ स्वतः येथे उपस्थित राहिल्या, याबद्दल आम्ही सर्व पनवेलकर त्यांचे आभारी आहोत. महाराष्ट्रात केवळ नागपूर, नांदेड आणि नवी मुंबई येथे हा कार्यक्रम होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे कोकणात इतका मोठा सोहळा होत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.  ‘हिंद दी चादर’ हे शीर्षक श्री गुरु तेग बहादूर यांच्या शहादतीची आठवण करून देणारे आहे. त्यांच्या बलिदानाचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. समाजाची आत्मजागृती व्हावी आणि इतिहास विस्मरणात जाऊ नये, यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. हा जरी शासनाचा कार्यक्रम असला, तरी तो संपूर्ण समाजाचा कार्यक्रम आहे. शासनाने तो आपला मानून सर्व यंत्रणा झोकून दिली आहे.  गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत.  त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

     हा समागम निश्चितच ऐतिहासिक ठरेल. लाखोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहतील, आणि आपण सर्वजण मिळून हा कार्यक्रम यशस्वी करू, असा विश्वास श्री. ठाकूर यांनी  यावेळी व्यक्त केला.


Post a Comment

Previous Post Next Post