यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुंबई विभागीय केंद्र राबवणार विविध उपक्रम !

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुंबई विभागीय केंद्र  राबवणार विविध उपक्रम !
शाळा संपर्क अभियान -२.०, वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि ग्रंथ प्रदर्शनी अभियान

मुंबई : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुंबई विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या मुंबई - शहर व उपनगरे, ठाणे, पालघर व रायगड  या जिल्ह्यांमधून शाळा संपर्क अभियान -२.०, वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि ग्रंथ प्रदर्शनी अभियान  हे उपक्रम  दिनांक 1 ते 15 जानेवारी 2025  या कालावधीत राबवण्यात येणार आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षेतेखाली व प्र. कुलगुरू, डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन 'अभियान प्रमुख'  यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राज्यभरातील आठ विभागीय केंद्रांतर्गत आयोजित करण्यात येत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020,  स्कुल कनेक्ट २.०, वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा समन्वयक व जिल्हा प्रमुखांना मदतनीस म्हणून 20 रिसोर्स पर्सन्स (साधन व्यक्ती) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मुंबई विभागाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. वामन नाखले यांनी सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक पर्यायांबाबत व्यापक जनजागृती करणे, विशेषतः इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक, तांत्रिक, रोजगाराभिमुख कौशल्यांची माहिती करून देणे, विविध शिष्यवृत्तींची माहिती देणे,  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड जोपासणे इ. लक्षवेधी बाबी या उपक्रमांतर्गत समाजापुढे मांडण्यात येणार आहेत. मुंबई विभागात विविध ठिकाणी शाळा संपर्क अभियान 2.0  सुरू झाले असून अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून  साधन व्यक्तींनी व्याख्यानांद्वारे विद्यार्थी-पालक जागृती सुरू केली आहे. ज्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या मानसिकतेत  सकारात्मक बदल होण्याची विद्यापीठाला अपेक्षा आहे.

वाचन संस्कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पाठ्यक्रमा  व्यतिरिक्त कोणतेही आवडीचे पुस्तक निवडावे. त्याचे वाचन करून परीक्षण करावे.  पुस्तकातील विचारांचा आपल्यावर झालेला परीणाम 500 शब्द मर्यादेच्या निबंध रूपात  सादर करावयाचा आहे. निवडक निबंधांना विभागीय स्तरावर व राज्य स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक  देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुक्त विद्यापीठाद्वारे उपलब्ध शिक्षणक्रमांची माहिती असलेला तसेच थोर व्यक्तींचे विचार प्रदर्शित करणारा चित्ररथही प्रत्येक जिल्ह्याच्या अंतर्गत दोन दिवस फिरणार आहे.

      १२ जानेवारी 2025  रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त वाचन दिन साजरा करण्यात येणार असून  सार्वजनिक वाचनालयांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सलग १२ तास, १८ तास, २४ तास वाचन करण्याकरीता युवक व युवती यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post