भिवंडी : भिवंडी येथील श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय, श्री. महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय, श्री. पंडित बाबुराव चौघुले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनचे आयोजन कॉजेच्या प्रांगणात करण्यात आले होते. तसेच गावात ग्रंथ दिंडी मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत ग्रंथ दिंडीची सुरुवात कॉलेजच्या प्रांगणापासून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचनाच्या सवयी आणि वाचनाचे महत्त्व प्रतिबिंबित करणारे आणि प्रोत्साहन देणारे वेगवेगळे प्लेकार्ड तयार केले होते. ते या दिंडीचे विशेष आकर्षण ठरले दिंडीत विद्यार्थ्यांकडून विविध भाषांमध्ये विविध घोषणांचे पठण करण्यात आले. श्री. महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक दहिवले, श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ.गायत्री पाटील, प्राध्यापक विठ्ठल दिवेकर, तसेच विधी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सौ. अलका ढगे, ग्रंथपाल समिधा पाटील, व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
शाश्वत जीवन जगण्यासाठी वाचन आवश्यक - प्राचार्य डॉ. गायत्री पाटील
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. डॉ. गायत्री पाटील यांनी सध्याच्या धावपळीच्या काळात स्थिर, शाश्वत जीवन जगता यावे, यासाठी वाचन आवश्यक आहे,’’ असे मत मांडले. तसेच वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते. विचार क्षितिज विस्तारीत होते. व्यक्तीमध्ये सर्जनशीलता येते. विविध, कथा, कादंबऱ्यांचे आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तके वाचून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टीकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात.
वाचनाची गोडी असणे आवश्यक - सौ. अलका ढगे, ग्रंथपाल
पुस्तके समाजाला आणि जीवनाला जोडतात. त्यामुळे सगळ्यांना ग्रंथ व पुस्तक वाचनाची गोडी असणे आवश्यक आहे.
प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले कौतुकास्पद परिश्रम - प्राचार्य डॉ. विनायक दहिवले
प्राचार्य डॉ. विनायक दहिवले यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे मनापासून कौतुक केले. पुस्तकांचा गुच्छ असलेली सुंदर आणि आकर्षक सजवलेली पालखी बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. दिंडीदरम्यान प्राध्यापकांनी वाचनाबाबत अनेक नागरिकांची मते जाणून घेतली आणि त्यांनी सध्याच्या परिस्थितीत वाचनाची गरज आणि महत्त्व याविषयी त्यांचे मत मांडले आणि उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे कौतुक केले. तसेच ग्रंथ दिंडीचे नियोजन चांगल्या प्रकारे केल्या असल्यामुळे ग्रंथपाल सौ. समिधा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तसेच आभार मानले.
प्राध्यापक विठ्ठल दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ दिंडी ठरली लक्षवेधी
कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी प्राध्यापक विठ्ठल दिवेकर यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली होती. ही ग्रंथ दिंडी लक्षवेधी ठरली.